मुंबई : मुंबईत शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, एप्रिल महिन्यात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानाचा हा उच्चांक आहे. त्याचप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा मारा सुरू असतानाच येत्या २४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुन्हा दिला आहे. दुसरीकडे मुंबई दिवसेंदिवस तापू लागली आहे. गेल्या मंगळवारी तेलंगणा, विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. हवामानातील या बदलाला ७२ तास उलटत नाहीत तोवर ९ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १० ते १२ एप्रिल या कालावधीत राज्यातील हवामान कोरडे राहील. पुण्याचा विचार करता ९ ते १४ एप्रिल या कालावधीत पुण्यासह आसपासच्या परिसरातील हवामान ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान ३८, २२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत अवकाळी पाऊस पडल्यानंतर उकाडा वाढला. गुढीपाडव्याला मिरवणुकीनिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना शुकवारी उकाड्याचा फटका बसला. (प्रतिनिधी)> राज्यातील कमाल तापमान : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
मुंबई @ ३६.८ अंश सेल्सिअस
By admin | Published: April 09, 2016 3:48 AM