मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबापुरीतले राजकीय वातावरण तापले असतानाच आता ऋतू बदलाच्या काळात येथील हवामानातही बदल नोंदवण्यात येत आहेत. प्रतिचक्रीवादळ, वाऱ्याची बदलती दिशा आणि वारे स्थिर होण्यास लागणारा विलंब हे घटक मुंबईतील कमाल तापमान वाढीस कारणीभूत आहेत. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत ही वाढ ५.७ अंश सेल्सिअस असून, बुधवारी मुंबईचे किमान तापमान ३७.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात हा काळ ऋतू बदलाचा आहे. या काळात तापमानात काही अंशी वाढ नोंदवण्यात येते. सद्य:स्थितीमध्ये मध्य प्रदेशावर प्रतिचक्रीवादळासारखी स्थिती असून, पूर्वेकडून दक्षिणेकडे वेगाने वारे वाहत आहेत. हवामानात हे बदल नोंदवण्यात येत असतानाच मुंबईचा विचार करता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. हे वारे स्थिर होण्यास उशीर होत असल्याने मुंबईच्या तापमानाचा पारा चढतो आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत तापमानात चढउतार होत राहतील आणि कमाल तापमान अधिक नोंदवण्यात येईल. (प्रतिनिधी)
मुंबई ३७.२ अंशांवर
By admin | Published: February 16, 2017 4:57 AM