विवेक भुसे पुणे / मुंबई : मुंबई तसेच कोकणात २९ आॅगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी धुवाधार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते़ संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचे वर्णन तुंबई असे केले गेले़ असे असले तरी ही काही पहिलीच वेळ नाही़ मुंबईत एकाच दिवसात २०० मिमी पाऊस होणे हे सामान्य असल्याचे मागील ६५ वर्षांतील आकडेवारी पाहिली असता दिसून येते़ पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात १९५० ते २०१५ या ६५ वर्षांत मुंबईत तब्बल ५१ वेळा एका दिवसात २०० मिमी पाऊस झाल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे पाऊस हा नेहमीसारखाच असला तरी पावसाच्या पाण्याचे निचरा न होणे हे त्यामागील कारण असल्याचे स्पष्ट होते.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ एक़े. श्रीवास्तव यांनी याबाबत केलेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे़ मुंबई व कोकण विभागात पावसाळ्यामध्ये एका दिवसात २०० मिमी पाऊस होणे ही तशी सामान्य घटना आहे़ मागील ६५ वर्षांत अनेकदा असे आढळून आले की, एकाच वर्षात एकाच दिवसात २०० मिमी पाऊस दोनदा किंवा काही वेळा तीनदा पडला आहे़मुंबई व कोकणात पडणारा इतका पाऊस हा हवामानाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वसाधारण आहे़ मागील पाच वर्षांचा विचार केला तर २०११ मध्ये २८ व २९ आॅगस्टला सांताक्रूझ येथे अनुक्रमे २२०़४ मिमी व २३२ मिमी पाऊस पडला होता़ त्यानंतर २०१२ मध्ये एका दिवसात इतका पाऊस झाला नाही़ २४ जुलै २०१३ रोजी २१५़६ मिमी, ३ जुलै २०१४ रोजी २०७ मिमी व १९ जुलै २०१५ रोजी २८३ मिमी पाऊस एकाच दिवशी पडला होता़ तसेच २००९ मध्ये ५ व १५ जुलै, २००७ मध्ये २४ जून आणि १ जुलै तसेच २००५ मध्ये तर ५ व २७ जुलै व १ आॅगस्ट अशा एका वर्षात दोन किंवा तीन वेळा एकाच दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईत पडला़ हे पाहता एका दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईमध्ये साधारणपणे नियमित होत असतो़१९५० ते २०१५ या ६५ वर्षांत ५१ वेळा एकाच दिवसात २०० मिमी पाऊस झाला होता़१० वर्षांमध्ये एकाच पावसाळ्यात २ वेळा २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस.२ वर्षे एकाच हंगामात तीन वेळा २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस (१९५८ आणि २००५ ).१९५२ मध्ये ४ वेळा एकाच दिवसात २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस़
मुंबईत ६५ वर्षांत ५१ वेळा २०० मिमी पाऊस, धुवांधार पावसानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 2:32 AM