लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर: मुंबई आणि महामुंबईकरांच्या गुरुवारची सुरुवात धुवाँधार पावसाने झाली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने लोकल, रेल्वे, विमान वाहतुकीला ब्रेक लावला. पावसाचा जोर दुपारपर्यंत वाढतच गेला. त्यामुळे ‘२६ जुलै’च्या आठवणींनी मुंबईकरांना धडकी भरली.
पावसामुळे यंत्रणांचे अक्षरश: ‘पानी’पत झाले. मात्र दुपारनंतर पाऊस ओसरल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आज, शुक्रवारीही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज तर रायगडला रेड अलर्ट दिला आहे.
आज शाळांना सुटी
कल्याण, डोंबिवलीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे केडीएमसी शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी पत्रक काढले. रायगडातही सुट्टी जाहीर झाली आहे.
२९ जुलैपासून...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणांतील पाणीसाठा ६६ टक्क्यांवर गेल्याने मुंबईसह ठाणे शहर, भिवंडीतील १० टक्के पाणीकपात २९ जुलैपासून मागे घेण्यात येणार आहे. मुंबई महानगराला वर्षभर पुरेसे पाणी पुरविण्यासाठी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये एकत्रितरीत्या एकूण उपयुक्त पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. मात्र, गेल्या उन्हाळ्यात तो संपल्याने राखीव पाण्यासाठ्यावर मुंबईकरांची तहान भागवावी लागली होती.
६६.७७% जलसाठा
गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत दमदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे सातही धरणांतील एकत्रित पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण भरून वाहू लागले आहेत. पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचल्यामुळे आता १० टक्के पाणी कपात रद्द केली जाणार आहे.
महाड, रोहा, कर्जतमध्ये पुराचे पाणी
अलिबाग : रायगड जिल्ह्यातही बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री आदी प्रमुख नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. यातील म्हसळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागत आहे. रायगडमध्ये हवामान विभागाने २४ जुलै रोजी काही भागांत २४ तास अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. दक्षिण रायगडमधील नागोठणे, रोहा, महाड या भागांत यामुळे पूरस्थिती निर्माण झाली.
पुणे पाण्यात, कोल्हापूरलाही वेढा
गेले तीन दिवस मराठवाडा वगळता सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात जलद गतीने वाढ होऊन धरणे वाहू लागली आहेत. अवघ्या चोवीस तासांत धरणसाठ्यात चार टक्के वाढ झाल्याने अनेक धरणांतून विसर्ग सोडल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्याने पुणे शहरात आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांत शुक्रवारसाठी रेड अलर्ट जारी केला.
पुण्यात डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे पहाटे नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ताम्हिणी घाटातील आदरवाडीत दरड कोसळून एकाचा बळी गेला. मावळ, मुळशी, भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. सर्वाधिक ५५६ मिलिमीटर पाऊस ताम्हिणी घाटात नोंदला आहे. जिल्ह्यातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे पुढील दोन दिवसांसाठी तातडीने बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ प्रमुख राज्यमार्ग व ५ प्रमुख जिल्हामार्ग, असे सात मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. मदत व बचावकार्यासाठी लष्कर, तसेच आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या.
चंद्रपूरच्या १६ गावांचा मार्ग बंद
चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा, इरई, वर्धा, उमा व अंधारी नदीला पूर आल्याने बल्लारपूर, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यांतील एकूण १६ गावांचा मार्ग गुरुवारी बंद झाला.
‘राधानगरी’चे पाच दरवाजे उघडले
पंचगंगा नदी कोल्हापूरजवळून धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने महापुराचा धोका वाढला आहे. पंचगंगेची धोका पातळी गुरुवारी दुपारी ४३.०३ फुटांवर होती.
‘कृष्णा’, ‘वारणा’ नद्यांना पूर
‘कृष्णा’, ‘वारणा’ नद्यांना पूर आला असून, कृष्णा नदीची गुरुवारी सांगली आर्यविन पूल येथे ३३ फूट पाणीपातळी झाली आहे. काेयनेतील साठा ७८ ‘टीएमसी’ झाला आहे.
आज कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज : पुणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा रेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्हा यलो : मराठवाडासह इतर सर्व जिल्हे.
ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे, तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे. काळजीचे कारण नाही, मात्र नागरिकांनीदेखील आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडावे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री