मुंबई-
राज्यात १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. अनंत चतुदर्शीनंतरचा दिवस उजाडला तरी अद्याप मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका संपलेल्या नाहीत. मुंबईत लालबागच्या राजाचं अद्याप विसर्जन झालेलं नाही. लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. तर पुण्यातील रस्त्यांवर काल ज्यापद्धतीनं भक्तांची गर्दी पाहायला मिळाली तीच परिस्थिती आजही कायम आहे. पुण्यातील लक्ष्मीरोड परिसर अजूनही नागरिकांनी तुडूंब भरला आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक अजूनही सुरूच आहे. त्यामुळे यंदा गणपती विसर्जन मिरवणुकांचा विक्रम झाला आहे.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक LIVE:
मुंबईत काल लालबागच्या राजाची मिरवणूक सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू झाली होती. पण जवळपास सहा तास मिरवणूक लालबाग परिसरातच होती. संध्याकाळचे सहा वाजले तरी लालबागचा राजा काल श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळाजवळच होता. त्यामुळे यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला उशीर होणार याची कल्पना कालच आली होती. गेली दोन वर्ष कोरोनामुळे सण साजरे करण्यावर निर्बंध आले होते. त्याची कसर नागरिकांनी यावेळी भरुन काढलेली दिसते. कारण दरवर्षीपेक्षा यंदा लालबाग परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीमुळे लालबागच्या राजाच्या मिरवणूक हळूहळू मार्गस्थ होत होती. लालबागच्या राजाची मिरवणूक सध्या गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. पण या मिरवणुकीसोबतच शहरातील इतरही मंडळांच्या मोठमोठ्या गणेशमूर्ती अजूनही चौपाटीवर पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील विसर्जन मिरवणूक संपण्यासाठी आणखी काही तास लागण्याची दाट शक्यता आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक LIVE:
दुसरीकडे पुण्यातही यंदा मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुकांचे रथ सजवण्यात आले होते आणि जय्यत तयारी करण्यात आली होती. मानाच्या पाच गणपतींचं काल दुपारी विसर्जन झालं. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा थाट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तिच गर्दी दुसरा दिवस उजाडला तरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.