ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - ''मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही. निवडणुकीच्या काळात शिवसेनेसोबत मतभेद झाले आहेत, मात्र, ते तितके टोकाचे नाहीत'' असं वक्तव्य भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी केलं आहे.
शिवसेनेसोबत वैचारिक मतभेद नाहीत, त्यांच्यासोबत युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. जे झालं ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. असं ते एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले.
शिवसेना-भाजपा युती झाल्यास महापौर कोणाचा होणार या प्रश्नावर, आपलाच महापौर बसावा असं प्रत्येकाला वाटतं. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही समजदार आहेत. त्यांनी विचार करून निर्णय घ्यावा असं ते म्हणाले.