मुंबई : मागील आठवड्यातील गुरुवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मारा अद्यापही कायम ठेवला आहे. बुधवारी तर मुंबईत पडलेल्या पावसाची १४२.६ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून, दिवसभर कोसळलेल्या या पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लावल्याचे चित्र होते. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर बेजार झाल्याचे चित्र आहे.गेल्या आठवड्यातील गुरुवारी मध्य भारतावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती, पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने राज्यासह मुंबईत जोर पकडला. गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ घेतलेली विश्रांती वगळता, जलधारांचा मारा सुरूच आहे. बुधवारी सकाळी झालेल्या वातावरणीय बदलामुळे पाऊस उघडीप घेईल, असा अंदाज मुंबईकरांना होता. मात्र, मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून जोरदार मारा सुरू केला.बुधवारी सकाळी कुलाबा, फोर्ट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, भायखळा, लालबाग, लोअर परळ, परळ, वरळी, माहीम, दादर, माटुंगा आणि सायन येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथेही सकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे सकाळी हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने धावत्या मुंबईला काहीसा ब्रेक लावला. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक मंदावली, तर ठिकठिकाणी वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांचा अर्धाधिक वेळ प्रवासात गेल्याचे चित्र होते. मुंबई शहरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्ग, पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला-सीएसटी रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड आणि पश्चिम उपनगरात एस.व्ही. रोडवरील वाहतुकीचा वेग पावसामुळे मंदावला होता. विशेषत: सकाळऐवजी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)>गारव्यात वाढमागील सहा दिवसांपासून शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, २६ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. मुंबईतील गारव्यात वाढ झाली असून, पुढील ७२ तासांसाठी कमाल, किमान तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई बेजार
By admin | Published: September 22, 2016 2:41 AM