मुंबई : मुंबईतील २०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोटात वापरलेले अमोनियम नायट्रेट, जिलेटीन हे मंगलोरपासून ९२ किमीवरील कुंदापूर शहरातून आणले होते. ही माहिती जैनुल अबिदिन शेख याने दिली. एटीएसने त्याला मंगळवारी येथे अटक केली आहे. जैनुलने दिलेल्या माहितीनुसार भायखळ्यातील हबीब मंजील येथे १३ जुलैच्या स्फोटापूर्वी ही स्फोटके आणण्यात आली होती. या ठिकाणी यासीन भटकळ आणि त्याचे दोन सहकारी राहत होते. कुंदापूर हे मंगलोरजवळील समुद्रकिनाऱ्यालगतचे शहर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुल अबिदिनने डॉ. सय्यद अफाक याला ही स्फोटके मंगलोरमध्ये वकासकडे देण्यास सांगितले होते. यासीनने वकासला ती आणण्यासाठी मंगलोरला पाठविले होते. गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक हे जैनुलच्या चौकशीसाठी बुधवारी मुंबईत दाखल झाले. अहमदाबाद आणि बंगळुुरुसह देशातील अन्य बॉम्बस्फोट प्रकरणात जैनुल वाँटेड आहे. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटात एटीएसला जैनुलचा सहभाग आढळलेला नाही. मुंबई स्फोटानंतर तो फरार झाला होता. जैनुलला मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये सौदीत ताब्यात घेण्यात आले.
मुंबईतील स्फोटांसाठी मंगलोरहून स्फोटके!
By admin | Published: April 28, 2016 1:18 AM