मुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.उत्तरोत्तर कमाल तापमान स्थिर राहणार आहे. परिणामी, मुंबईकरांना बसणारे उन्हाचे चटके अधिकच वाढणार आहेत. कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच, दुसरीकडे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा विचार करता, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबईचा विचार करता, मागील तीनएक दिवसांपासून येथील कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ३० ते ३२ अंशावर असलेले कमाल तापमान, आता ३४, ३६ आणि ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तापदायक उन्हासह वाहते कोरडे आणि उष्ण वारे तापदायक वातावरणात आणखी भर घालत आहे. विशेषत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसत असून, रात्रीच्या उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.१३ ते १४ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१५ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील.१६ मार्च : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.१३ आणि १४ मार्च रोजी मुंबईचे कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३८, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
उन्हाच्या झळांनी मुंबई तापली; कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:45 AM