मुंबई/नवी दिल्ली - कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा वाद चांगलाच पेटला आहे. मात्र, आता या वादाने वेगळेच वळण घेतले आहे. कंगनाने नुकतेच एक ट्विट करत, बीएमसीचे काही अधिकारी आपल्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले आणि ते उद्या हे कार्यालय तोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा केला आहे.
कंगनाने ट्विट करत म्हटले आहे, की 'मुंबईतील हे मणिकर्णिका चित्रपटाचे कार्यालय आहे. हे कार्यालय मी पंधरा वर्ष मेहनत करून कमावले आहे. आयुष्यात माझे एकच स्वप्न होते, की जेव्हा मी चित्रपट निर्माता बनेन तेव्हा माझे स्वतःचे एक कार्यालय असेल. मात्र, हे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे, असे वाटते. आज तेथे अचानक बीएमसीचे लोक आले आहेत.'
कंगना रणौतने एक व्हिडिओदेखील पोस्ट कोला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या कार्यालयात काही लोक तपासणी करताना दिसत आहेत. हे लोक बीएमसीचे अधिकारी असल्याचे तिने म्हटले आहे. यासंदर्भात कंगनाने ट्विट करत म्हटले आहे, की हे लोक जबरदस्तीने माझ्या कार्यालयात घुसले आहेत. त्यांनी माझ्या शेजाऱ्यांनाही त्रास दिला. जेव्हा माझ्या शेजाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तेव्हा, त्या ज्या मॅडम आहेत, त्यांच्या कृत्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. मला उद्या सूचाना देण्यात येईल, की ते माझ्या प्रॉपर्टीची मोड-तोड करत आहेत.'
आणखी एका ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे, 'बेकायदेशीर बांधकामासंदर्भात नोटीशीसोबतच बीएमसीला स्ट्रक्चर प्लॅन पाठवणे आवश्यक आहे. आज त्यांनी माझ्या कार्यालयावर छापा टाकला आणि उद्या ते नोटिस न देताच संपूर्ण स्ट्रक्चर तोडतील'.
९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असं थेट आव्हान तिनं शिवसेनेला दिलं आहे. आज केंद्रानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची आज मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मापं घेतली. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल