Kishori Pednekar vs Deepak Kesarkar: एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदारांच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बंडखोरी केली आणि भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने त्यांच्यावर टीका करताना दिसले. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी देखील शिंदे गटावर टीका केली. शिंदे गटाची भूमिका परखडपणे मांडणाऱ्या दीपक केसरकर यांनी त्यानंतर आदित्य ठाकरेंवर सौम्य शब्दांत टीका केली. परंतु, त्यांच्या टीकेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला.
आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांची भाषा बोलू लागल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली होती. या टीकेवर उत्तर देत असताना, किशोरी पेडणेकर प्रचंड संतापल्या. "दीपक केसरकर हे उडते पंछी आहेत, इकडून उड आणि तिकडे बस, तिकडून उड आणि इकडे बस असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे आमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका" अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी केसरकरांविषयी संताप व्यक्त केला.
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या प्रवक्तेपदाची भूमिका स्वीकारली आहे. परंतु असे असले तरी किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. "जे आमच्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ आणि घेणारच. आजच्या घडीला सगळेच आशावादी आहेत. काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत, पण आजही आम्ही त्यांच्याकडे (शिंदे गट) बंधुत्वाच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे आशा बाळगण्यात काहीच गैर नाही. दीपाली सय्यद यांच्या मध्यस्थीने चांगलं काही घडणार असेल, तर चांगलंच आहे. पण आलात तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्याशिवाय", असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार!
"आम्ही सगळ्या लाटा, त्सुनामी पाहिल्या आहेत. त्या दर १५ वर्षांनी येतात. मी कोणाचं नाव घेत नाही. पण झालेली पडझड भरुन काढण्याची ताकद आम्हां शिवसैनिकात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकणार. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा फडकवणार", असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.