मुंबई, दि. 29 - मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व कॉलेज- शाळांना बुधवारीदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणा केली आहे. मंगळवारीदेखील अर्ध्या दिवसानंतर कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सांताक्रुझ परिसरात ९ तासात २९७ मिमी पाऊससांताक्रुझ येथील हवामान विभागात मंगळवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या ९ तासांत तब्बल २९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. त्यामुळे मुंबईकरांना २६ जुलैची पुन्हा एकदा आठवण झाली. याचवेळी कुलाबा वेधशाळेत दिवसभरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सांताक्रुझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १२६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतरच्या ३ तासात तब्बल १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा बहुदा विक्रमी पाऊस असू शकतो़ मंगळवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या २४ तासात कुलाबा १५१़८, सांताक्रुझ ८८़४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच डहाणू, तलासरी १९०, हर्णे १८०, महाबळेश्वर १७०, अलिबाग १६०, वलसाड, अकोला ७०, पेण २६०, म्हसाळा, मोखेडा २१०, जव्हार २००, मंडणगड, उरण १७०, माथेरान, रोहा, शहापूर १४०, अंबरनाथ, गुहागर, कल्याण, मुरबाड, मुरुड, उल्हासनगर, विक्रमगड १३०, चिपळूण, खेड, पनवेल, पोलादपूर, संगमेश्वर देवरुख १२०, ओझरखेडा १४०, मोहोळ १००, विदर्भातील अकोट १००, अर्जुनी मोरगांव, लाखंदूर, लाखानी, मोहाडी, पुसद ९० मिमी पाऊस झाला.घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी), डुंगरवाडी २१०, ताम्हिणी, भिरा १९०, शिरगाव १८०, अम्बोणे १५०, दावडी १४०, धारावी १४०, भिवपूरी ११०, खोपोली, लोणावळा (आॅफिस), लोणावळा (टाटा)८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.