काँग्रेसचा मुंबईतील बडा नेता नाराज? शिंदे गटात प्रवेशाची चर्चा! महायुतीची ताकद वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:23 AM2024-01-13T10:23:10+5:302024-01-13T10:23:55+5:30
Maha Vikas Aghadi Vs Mahayuti: मुंबईतील बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल, असे सांगितले जात आहे.
Maha Vikas Aghadi Vs Mahayuti: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार चाचपणीला सुरुवात केली असून, जागावाटपावर भर दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असून, हा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीने तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेसचा मुंबईतील एक बडा नेता नाराज असून, लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असा कयास बांधला जात आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. मिलिंद देवरा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल, असे म्हटले जात असून, शिंदे गटातील प्रवेशामुळे पर्यायाने महायुतीची ताकद वाढेल, अशी चर्चा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जाते.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करू शकतात, असे म्हटले जात आहे. मिलिंद देवरा शिवसेनेत आले तर, शिंदे गट हा दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असू शकतो. मात्र, भाजपा हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. यामुळे भाजपा आणि शिंदे गटात दक्षिण मुंबई मतदारसंघावरून संघर्ष होण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा आणि शिंदे गट उभयतांनी दावा केल्यास एकाला माघार घ्यावी लागेल.
श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची
काही मतांनुसार, शिवसेनेच्या शिंदे गटाचा नवी दिल्लीत कोणीही चेहरा नाही. मिलिंद देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटाने त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समजते. दक्षिण मुंबईत भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तसेच भाजपाकडून ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याला पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाकरे गटातील हा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपा या दोघांच्याही संपर्कात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. अरविंद सावंत हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर सावंत हे ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा सोडण्याची शक्यता नाही. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याचे समजते.