मुंबई : केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यापासून देशभर मोठे वादळ निर्माण झाले आहे. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैशावरील बिनतोड कारवाई असल्याचा दावा भाजपा करीत असली तरी या निर्णयामुळे केवळ सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्याचा आरोप करीत विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबई काँग्रेसने याच मुद्द्यावरून ‘नोट पे चर्चा’ या अभियानाची घोषणा केली आहे. आगामी महापालिका निवडणूक पाहता नोटाबंदीचे राजकारण दीर्घकाळ रंगण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांना संबोधित करताना नोट पे चर्चा अभियानाची घोषणा केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेच्याच अडचणी वाढल्या आहेत. स्वत:चेच पैसे काढण्यासाठी लोकांना बँकेसमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे. या मनस्तापामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यूदेखील झालेला आहे. नोटाबंदीमुळे घरातील लग्नकार्य, रुग्णांचे उपचार अडले आहेत. डायमंड मार्केट, ज्वेलरी मार्केट, रिटेल मार्केट, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, होम अप्लायंस, फार्मा इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, कपडा मार्केट अशा सर्व इंडस्ट्रीला ७० ते ८० टक्के फटका बसला आहे. त्यामुळे बेरोजगारीचा धोका वाढल्याचे निरुपम म्हणाले. जनतेला अडचणींचा सामना करावा लागत असतानाच मल्ल्यासारख्या ६३ कर्जबुडव्यांना कर्जे माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. माफ केलेल्या कर्जाचा आकडा ७ हजार कोटींच्या वर असून, या मेहेरबानीचे कारण मोदींनी जनतेला सांगावे, असे आव्हानही निरुपम यांनी दिले. (प्रतिनिधी)
मुंबई कॉँग्रेसचे ‘नोट पे चर्चा’ अभियान
By admin | Published: November 18, 2016 6:46 AM