विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसने घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:29 AM2019-05-07T03:29:46+5:302019-05-07T03:30:02+5:30
लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकांच्या आढाव्यानिमित्त आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दाचा निषेध आमदार नसीम खान यांनी केला. तसा ठरावही बैठकीत सर्वानुमते मंजूर झाला.
प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार भाई जगताप, अमीन पटेल, माजी आमदार बाबा सिद्दीकी, चरणसिंग सप्रा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून युती सरकारने मुंबईचा विकास थांबविला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाचा वेग देण्यासाठी आपण अर्थतज्ज्ञ आणि इतर मान्यवरांची मदत घेत योजना बनविणार आहोत. त्यातून मुंबईला पुन्हा गतवैभव मिळेल. गरिबांच्या विकासाबरोबर युवा वर्गांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास काँग्रेसचे प्रथम प्राधान्य असेल, असे सांगून देवरा यांनी मुंबईकरांना दिलेल्या ५०० चौरस फुटांच्या घराच्या आश्वासनाबाबत ठाम असून ही योजना पूर्ण करायची असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड म्हणाले, पक्षाने योग्य वेळेत विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांचा जो प्रतिसाद मिळाला आहे, त्याने मुंबई काँग्रेसची ताकद वाढली आहे.