मुंबई : मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचे नाव घेत नाही. काल रात्री एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलासह दहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर आज त्यांची चौकशी करून अटक केली. तसेच, त्यांना आज कोर्टात हजर केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह तिघा जणांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित 5 जणांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, आर्यन खानवर या प्रकरणात गुन्हा दाखल होणार की नाही ही चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सध्या क्रुज रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली, याबाबत विचारणा केली असता मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, मोठ्यांची मुले असू देत किंवा कुणाचीही असू देत. प्रत्येकाला कायदा, नियम सारखेच ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, काल रात्री एनसीबीने एका क्रुझवर छापा मारत आर्यन खान याच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. तसेच, या प्रकरणात एनसीबीला आर्यन खानकडे अमली पदार्थ सापडले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. एनसीबीने आज सायंकाळी आर्यनसह आठ जणांना अटक केली.
तिघांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने तिघांचीही उद्यापर्यंत एनसीबीला कोठडी दिली आहे. यामुळे आर्यन खानसह तिघांना आजची रात्र कोठडीत घालवावी लागणार आहे. तसेच अन्य ५ आरोपींना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.