ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - मुंबईतील जुहू येथील समुद्रकिना-यावर काल रात्री सुमारे ३० फूट लांबीचा मृत व्हेल मासा आढळला. तो व्हेल ब्रुडीज जातीचा असल्याची माहिती असून त्याचे वजन तब्बल २० टन असल्याचे समजते.
समुद्राला भरती आल्याने काल रात्री हा मासा वाहून जुहूच्या किना-यावर पोहोचला आणि वाळूत रुतून बसला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा दिसत असून एखाद्या जहाजाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. थोड्याच वेळात या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे. वनखात्याकडून रात्रभर या ठिकाणची पाहणी सुरु होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूतील तूतीकोरिन जवळील तिरुचेंदुर बेटावर ४५ देवमासे मृत अवस्थेत दिसून आले होते.