मुंबई - मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असलेले राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आज थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे जयदीप राणा या ड्रग्स पेडलरसोबतचे फोटो शेअर करत मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या या राणाशी फडणवीस यांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी विचारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्राकर परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिवाळीच्या सुरुवातील लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. ते सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. जो फोटो त्यांनी याठिकाणी दाखवला आहे त्याबाबत कालच रिव्हर मार्चने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या क्रिएटिव्ह टिमने हायर केलेला हा माणूस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चार वर्षांपूर्वीचा फोटो आज सापडला आहे आणि रिव्हर मार्च ही संघटना आहे. ती मुंबईत नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काम करते. त्याचे अध्यक्ष असलेले चौगुले यांनी आम्हाला विनंती केली होती. त्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी त्यांनी जे काही गाणं तयार केलं गेलं होतं. तेव्हा हे फोटो काढण्यात आले होते. त्यात माझेही फोटो होते. मात्र जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचे फोटो ट्विट केले गेले. यामागील मानसिकता स्पष्टपणे दिसते. याबाबत रिव्हरमार्चनेच स्पष्टीकरण दिले आहे. की त्यांच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारांशी त्याचा संबंध नाही आहे. तसेच तेव्हा जेव्हा तिथे जे लोक आले होते. ते रिव्हरमार्चकडून आले होते. त्यांचा माझ्याशी किंवा माझ्या पत्नीशी दुरान्वयेही संबंध नाहीस असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी ड्रग्स प्रकरणाशी भाजपाचा संबंध जोडणाऱ्या मलिकांनाही फडणवीस यांनी उत्तर दिले. ज्या प्रकारे एका व्यक्तीवरून भाजपाचं ड्रग्स कनेक्शन असल्याचं सांगत आहेत. आता नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ससकट सापडला होता. त्यामुळे नवाब मलिक यांचाच रेश्यो लावला तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसलाच ड्रग्स माफिया म्हटलं पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
मी काचेच्या घरात राहत नाही. सुरुवात नवाब मलिकांने केली आहे. त्यामुळे आता शेवट करावाच लागेल. विटेला दगडाने उत्तर कसं द्यायचं हे मी जाणतो. मी पुराव्याविना आरोप करत नाही, तसेच मला पुरावे मागेही घ्यावे लागत नाहीत, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी हा आरोप केला.