मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी १२ वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस नेमका कोणता गौप्यस्फोट करतात आणि नवाब मलिकांवर कोणता आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवाब मलिक यांनी लवंगी लावली, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी १२ वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याविरोधात गंभीर आरोप करणाऱ्या मोहित कंबोज यांनीही या पत्रकार परिषदेबाबत सूचक विधान केले आहे. नवाब मलिकजी तुम्ही अनिल देशमुख यांच्यासोबत नवे वर्ष साजरे कराल. २०२२ साठी टिफीन मागवून घ्या, असे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले होते.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना प्रत्युत्तर दिले होते. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे. आता शेवट मी करणार. त्यांनी लवंगी लावली, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार. नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.