मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या महिनाभरापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आज नवाब मलिक यांनी एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, समीर वानखेडे यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिल्यानंतर आता क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच तिने प्रसारमाध्यमांनाही खडेबोल सुनावले आहेत.
यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये क्रांती रेडकर म्हणते की, डियर मीडिया मला माहिती आहे की, नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटमुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. मात्र मी हे सांगू इच्छिते की, या प्रकरणात माझी बहीण पीडित होती आणि पीडित आहे. आमच्या लीगल टीमच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने असल्याने यावर प्रतिक्रिया देणे हा समजुतदारपणा ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विट विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. मात्र समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे.
त्याआधी समीर वानखेडे यांनीही मलिक यांनी केलेल्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक उल्लेख करत असलेलं प्रकरण जवळपास १३-१४ वर्ष जुनं आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाली तेव्हा माझा आणि क्रांती रेडकरचा विवाहदेखील झाला नव्हता. तसेच मी त्यावेळी एनसीबीच्या नोकरीतही नव्हतो. मग त्याचा काय संबंध?, असा सवाल उपस्थित करत समीर वानखेडे यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांची हवा काढून टाकली आहे.
आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. समीर वानखेडे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे, असा दावा मलिक यांनी केला होता.