मुंबई - अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीविरोधात समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली एनसीबीकडून सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. दरम्यान, एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, काल एका सभेत बोलताना नवाब मलिक यांनी एका वर्षांत समीर वानखेडेंची नोकरी घालवणार. त्यांची तुरुंगात रवानगी करणार, असे विधान केले होते. त्यामुळे राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य सरकारकडून समीर वानखेडेंची चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही. त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील मावळ येथे एका सभेला संबोधित करताना नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार टीका केली होती. मी खुले आव्हान देतो की, एका वर्षाच्या आत समीर वानखेडे यांची नोकरी घालवणार, समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित आहे. तुम्ही केलेला खोटारडेपणा जनतेच्या समोर आणणार, समीर वानखेडे यांचे वडील आणि त्यांच्या घरातील सर्व लोक बोगस आहेत, असे नवाब मलिक म्हणाले होते. दरम्यान, याबाबत समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.