मुंबई - एनसीबीने मुंबईत आलिशान क्रूझवर गेल्या महिन्यात कारवाई करून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याने खळबळ उडाली होती. त्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या कारवाया आणि अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आरोप प्रत्यारोपांच्या या लढाईला नवाब मलिक यांनी दिवाळीनिमित्त अर्धविराम दिला आहे. मात्र रविवारी भेटूया म्हणत मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत ट्विटमधून दिले आहेत.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, शुभ दीपावली. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुमची दिवाळी मंगलमय जावो. हॉटेल द लालितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. रविवारी भेटूया, अशा शब्दात मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.
नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आजही नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. 'बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे,'असे सूचक ट्विट मलिकांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. यात काहीजण मलिकांची बाजु घेत आहेत, तर काहीजण त्यांनाच ट्रोल करताना दिसत आहे. दरम्यान, या सूचक ट्विटवरुन मलिक नवा खुलासा करणार, असाही एक अंदाज लावला जात आहे.
वानखेडेंचे खासगी सैन्य...याआधीही नवाब मलिक यांनी वानखेडे यांचे व्हॉट्सअॅप चॅट आणि एक अनोळखी फोन नंबर शेअर केला होता. या चॅटवरून असे दिसते की, वानखेडेनेंनी त्यांच्या बहिणीचे बिझनेस कार्ड आणि ऑफिसचे लोकेशन शेअर केले होते. मलिक यांनी आरोप केला की, "समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी एक खासगी सैन्य आणले आहे, ज्यामध्ये मनीष भानुशाली, सॅम डिसूझा यांच्यासह अनेक लोक आहेत. ते ड्रग्जचा व्यवसायही करतात, लोकांनाही अडकवतात. वानखेडे यांच्या माध्यमातून कोट्य़वधी रुपयांची वसुली झाल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे.
वानखेडे लाखो रुपयांचे कपडे वापरतातनवाब मलिक पुढे म्हणाले की, वानखेडे आल्यानंतर सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांना बोलावण्यात आले होते, परंतु आजपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असे का? या प्रकरणातून हजारो कोटींची वसुली करण्यात आली आहे. आम्ही म्हणालो की दुबई आणि मालदीवमधून वसुली झाली, तुम्ही म्हणालात की मी दुबईला गेलो नाही, बहिण गेली. मालदीवमध्ये जाण्यासाठी खर्च येतो, तो कुठून खर्च झाला याची चौकशी व्हायला हवी. वानखेडे 5 ते 10 कोटींचे कपडे घालतात. 2 लाखाचे बूट घालणारी व्यक्ती प्रामाणिक आहे का? हातातील घड्याळ 20 लाखांचे आहे. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचे जीवनमान असेल असूच शकत नाही, असंही मलिक म्हणाले होते.