मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. एकीकडे या प्रकारणाचा तपास करत असलेल्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. दरम्यान, गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता मनसे पुढे सरसावण्याची शक्यता दिसत आहे.
लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियवर विशेष कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे सूचक ट्विट केले आहे. केवळ दोन शब्दांच्या या सूचक ट्विटमधून या प्रकरणातील आपली भूमिका मनसेने स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्यावर मनसेच्या पदाधिकारी असलेल्या जास्मिन वानखेडे यांचा मनसेने बचाव केला होता. तसेच जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा अभिमान आहे, असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले होते. दरम्यान, मनसेने आता वानखेडेंबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणावूरन पुढच्या काळात मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.