मुंबई - मुंबई ड्रग्स केसवरून आमने-सामने आलेले महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वादात दररोज नवनवे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले नवाब मलिक ठरावीक वेळाने वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला आहे.
नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट करून समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत अजून माहिती समोर आणली आहे. या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना अडचणीत आणले आहे. काल नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याचे निनावी पत्र शेअर करत समीर वानखेडे यांची कार्यपद्धती आणि त्यांनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित कले होते. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर मी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती मी केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.
नवाब मलिक यांना पाठवलेल्या पत्रामधून एनसीबीच्या या अधिकाऱ्याने समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. त्यासाठी समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे, असा दावा या पत्रातून करण्यात आला होता.
तसेच बनावट केस उभ्या करण्यासाठी समीर वानखेडे यांनी एक टीम उभी केली आहे. त्यामध्ये सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयोएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे, असा दावाही करण्यात आला होता.