मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत अजून एक मोठा आणि अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे.
नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट करत हे पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात की, एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
एनसीबीमध्ये काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी तयार झाली आहे. ही टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते. अशा २६ केसचा या पत्रामध्ये उल्लेख आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या दाव्याचा नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे. एका गरजू मागासवर्गीत उमेदवाराचा नोकरीचा हक्क समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून हिरावल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच यासंदर्भात जातवैधता समितीकडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना पाठवलेल्या निनावी पत्रामध्ये समीर वानखेडेंनी हाताळलेल्य ड्रग्स प्रकरणाती २६ केसचा उल्लेख आहे. या पत्रात एनसीबीचा अधिकारी म्हणतो की, एनसीबीचे आधीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी समीर वानखेडे यांना अमित शाहांना सांगून नियमबाह्य पद्धतीने झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केले. तसेच समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना बॉलिवूडला सर्व मार्ग अवलंबून ड्र्ग्सच्या प्रकरणात अडकवण्याचे आदेश दिले. समीर वानखेडे हे एक खंडणीखोर अधिकारी असून, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहणे त्यांना आवडते, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे.