मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात मुंबई ड्रग्स केसवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. ही लढाई आता समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली असून, वानखेडेंच्या वैयक्तिक जीवनावरून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंच्या वडिलांनी हा दावा फेटाळला होता. मात्र आता नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.
नवाब मलिक यांनी रात्री दाऊद वानखेडेंच्या फेसबूक प्रोफाइलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या प्रोफाईलमध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांसारख्या दिसणाऱ्या फोटोखाली वानखेडे दाऊद असे नाव लिहिलेले आहे. हा दाऊद वानखेडे कोण अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आजही यावरून आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काल नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला होता. समीर वानखेडे यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे असं असून, त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
कोण आहेत समीर वानखेडे महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले होते. समीर वानखेडे हे अमली पदार्थां संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.