मुंबई - मुंबई ड्रग्स केसचा तपास करत असलेल्या एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात ठरावीक वेळाने ते नवनवे गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज दिवसाच्या सुरुवातीलाच नवाब मलिक यांनी अजून एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती दिली आहे. एनसीबीमधील स्पेशल २६ बाबत लवकरच माहिती देणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
या संदर्भात नवाब मलिक यांनी दोन ट्विट केली असून, त्यामध्ये ते म्हणतात की, एनसीबीच्या अधिकाऱ्याने पाठवलेले एक निनावी पत्र मला प्राप्त झाले आहे. यामधील माहिती लवकरच मी ट्विटच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहे. एनसीबीमधील स्पेशल-२६ बाबत मी लवकरच उगलडा करणार आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता या प्रकरणात ते कुठला नवा गौप्यस्फोट करणार आणि त्यामधून नेमकी कुठली माहिती समोर येणार याबाबत चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात मुंबई ड्रग्स केसवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. समीर वानखेडेंच्या वैयक्तिक जीवनावरूनही नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंच्या वडिलांनी हा दावा फेटाळला होता. मात्र आता नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. नवाब मलिक यांनी रात्री दाऊद वानखेडेंच्या फेसबूक प्रोफाइलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या प्रोफाईलमध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांसारख्या दिसणाऱ्या फोटोखाली वानखेडे दाऊद असे नाव लिहिलेले आहे.