मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी मलिकांच्या जावयाच्या घरात अंमली पदार्थ सापडल्याच्या केलेल्या दावा केला होता. त्याविरोधात नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी फडणवीस यांना जाहीर नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागून ४८ तासांत हे ट्विट डिलिट करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा असा इशारा दिला आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, नवाब मलिक यांनी काही फोटो शेअर करून आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्याविरोधात मी आता आपीसीच्या विविध कलमांखाली तक्रारीसह अब्रुनुकसानीची नोटिस पाठवण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी एकतर बिनशर्त जाहीर माफी मागावी व ते ट्विट ४८ तासांत डिलिट करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स माफियांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याचा, तसेच त्यांच्या जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्याविरोधात आज मलिक यांची कन्या निलोफर मलि-खान हिने घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. तसेच फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.
खोटे आरोप एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहोत, हे जाणून घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबत केलेले खोटे दावे आणि विधानांबाबत केली होती. त्याबाबत ही मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. आता या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही, असे निलोफर मलिक खान हिने यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.