मुंबई - मुंबईत आलिशान क्रूझवर झालेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता आपला मोर्चा भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांकडे वळवला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा काल नबाव मलिक यांनी केल्यानंतर भाजपा नेते मलिकांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आर्यन खान प्रकरणावरून मलिकांनी मोहित कंबोज यांच्यारही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना खुले आव्हान दिले आहे.
मोहित कंबोज यांनी एक ट्विट करून मलिक यांना हे आव्हान दिले आहे. त्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणतात की, नवाब मलिकजी माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर वादविवाद करा. वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा. दरम्यान, आता कंबोज यांच्या आव्हानाला नवाब मलिक काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात मोहित कंबोज यांनी कोर्टात धाव घेत मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मात्र यादरम्यान, नबाव मलिक यांनी पुन्हा एकदा मोहित कंबोज यांना लक्ष्य केले होते. तसेच मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. तसेच या सर्व अपहरण नाट्यामागे मोहित कंबोज हे मास्टर माइंड असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यानंतर हे आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले होते. तसेच त्या आरोपांविरोधातही कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता.