मुंबई - एनसीबीच्या मुंबई कार्यालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने समीर वानखेडेंविरोधात पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी प्रसिद्ध करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पत्रामधून एनसीबीच्या या अधिकाऱ्याने समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
नवाब मलिक यांना पाठवलेल्या या पत्रात सदर अधिकारी म्हणतो की, समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. त्यासाठी समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे. तसेच बनावट केस उभ्या करण्यासाठी समीर वानखेडे यांनी एक टीम उभी केली आहे. त्यामध्ये सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयोएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे.
ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे आणि विष्णू मीणा, ड्रायव्हर अनिल माने हे कुणाच्याही घरी तपास सुरू असताना ड्रग्स ठेवायचे आणि संबंधितांवर खोटी केस दाखल करतात. जर कुणाच्याही घरी ड्रग्स सापडला तर त्याचे प्रमाण अधिक दाखवून जामीन मिळू नये म्हणून त्याला व्यावसायिक ड्रग्सचे प्रकरण बनवायचे. तर आयओएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी जेआयओ सुधाकर शिंदे नकली पंचनामे रंगवायचे. हे पंचनामे एनसीबीच्या कार्यालयातच तयार केले जात, असा दावाही या पत्रातून करण्यात आले.
दरम्यान, समीर वानखेडे त्यांच्या काही हस्तकांकडून ड्रग्स खरेदी करतात आणि बनावट केस उभ्या करतात, असाही आरोप पत्रातून करण्यात आला आहे. समीर वानखेडेंच्या हस्तकांची नावे ही दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद, शेख, नासिर, आदिल उस्मानी अशी आहेत, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच समीर वानखेडेंनी तपास केलेल्या २६ खटल्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.