चंद्रपूर: मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपाला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपांना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार प्रयत्न करत आहे, असं वाटतंय. ड्रग्समुळे देशाची युवा पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपांना राजकीय संरक्षण नको. आरोपी हा कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
सरकारी यंत्रणांच्या कामात अडथळा नकोसध्या राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित नातेवाईंकांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सुधीर मुनगंटीवारांनी या धांडींवरही भाष्य केलं. तपास यंत्रणांना त्यांचे काम करु दिले पाहिजे. त्यांच्या कामात हस्तक्षेप कुणी करू नये. याबाबत मला कुठलीही माहिती नाही, असं ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते नवाब मलिक?क्रूझवरील पार्टीत एकूण 10 जण सापडले होते. पण कोर्टात 8 जणांना हजर करण्यात आलं. दोघांना एनसीबीने सोडून दिलं. यातलं एक व्यक्ती भाजप नेत्याचा मेहुणा क्रूझवर होता. तोदेखील आरोपी होता, मात्र एनसीबीनं त्याला सोडून दिलं. याचे पुरावे, व्हिडीओ पत्रकार परिषद घेऊन देण्यात येतील, असं मलिक यांनी सांगितलं.