ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - काळबादेवी येथील आगीत गंभीर जखमी झालेले मुंबईच्या अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे रविवारी निधन झाले. गेल्या १५ दिवसांपासून नेसरीकर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये मृत्यूशी झुंज देत होते.
मुंबईतील काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग विझवताना मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर हे जखमी झाले होते. नेसरीकर हे ५० टक्के भाजले होते व त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर त्वचारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. रविवारी दपारी उपचारादरम्यान नेसरीकर यांचे निधन झाले. नेसरीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. काळबादेवी आगीत सुधीर आमीन यांच्यापाठोपाठ मुंबई अग्निशमन दलातील आणखी एका जिगरबाज अधिका-याचे निधन झाल्याने अग्निशमन दलाला मोठा हादरा बसला आहे.