मुंबई : मागील दोन दिवसांपासून विदर्भात उसळलेली तीव्र थंडीची लाट सोमवारी ओसरली आहे, तर मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, पडलेल्या थंडीने मुंबईकरांना चांगलाच गारवा अनुभवास येत आहे.देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हिमवृष्टी होत असतानाच, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: विदर्भातील प्रमुख शहरांचे किमान तापमान १० अंशाच्या खाली नोंदवण्यात येत असून, नागपूरचे किमान तापमान सलग दोन दिवस ५ अंश नोंदविण्यात आले होते. सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ६ अंश एवढे नोंदवण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात व कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. २५ ते २९ जानेवारीदरम्यान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, तर पुढील ४८ तासांसाठी मुंबईतील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १४ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
मुंबई गारच!
By admin | Published: January 26, 2016 3:15 AM