जयंत धुळप,
अलिबाग- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८२ किमी अंतराच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरले आहे. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी गणेशभक्त या महामार्गावरून कोकणात जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर २९ आॅगस्टपूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करावे, अन्यथा येथून पुढे पळस्पे ते इंदापूर होणारे वाहनांचे अपघात आणि होणारी मानवीहानी यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी गेल्या २२ आॅगस्ट रोजी बैठकीत गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत फेंगडे यांना दिली होती. शुक्रवारी चार दिवस उलटले तरी पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील खड्डे बुजविण्यात प्राधिकरणास यश आलेले नाही. ‘लोकमत’च्या या महामार्गावरील ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी महामार्गाच्या या टप्प्याची पाहणी केली असता, अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली. महामार्गाच्या पेण ते खारपाडा या टप्प्यात खड्डे भरण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट असल्याचे दिसून आले. पेण ते वडखळ टप्प्यातील महामार्गाची दुरवस्था झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळदरम्यान उचेडे येथे भर पावसात डांबरीकरण सुरू होते. वडखळ ते नागोठणेदरम्यान काम पूर्ण झालेले नाही. पडत्या पावसात टाकलेले व रोल केलेले हॉटमिक्स टिकत नाही. रस्त्याची स्थिती बिकट असून, त्यामुळे प्रवास कठीण झाल्याचे पाली कॉलेजचे उप प्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले. कोलेटीच्या अलीकडे असलेला पूल ते कामत गोविंदा हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे त्यांनी सांगितले. कोलेटी ते नागोठणे मार्गातील भागात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वडखळ-पेणदरम्यान काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक तर काही ठिकाणी रेडीमिक्स काँक्र ीट टाकले आहे. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना दरवर्षीप्रमाणेच यंदाही खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. >‘महिनाअखेर काम होणार’केवळ साडेचार किमी अंतरातील खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे. ते ३० आॅगस्टच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, असा दावा गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत फेंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. एकनाथ शिंदे करणार पाहणीपालकमंत्री प्रकाश मेहता यांनी २२ आॅगस्ट रोजी स्पष्ट आदेश देऊनही महामार्ग दुरुस्तीबाबत गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या चार दिवसांत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यातच महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने २९ आॅगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पळस्पे (पनवेल) ते इंदापूर या ८२ किमी टप्प्यातील महामार्गाची पाहणी करणार आहेत.