मुंबई : मुंबई-गोवा रेल्वे प्रवास अर्ध्या तासाने घटणार आहे. भारतीय रेल्वेचा अत्याधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ‘तेजस’ एक्स्प्रेसची ताशी ११० किमी वेगाने चाचणी शुक्रवारी यशस्वीपणे पार पडली. या वेळी नेहमीच्या वेळेपेक्षा ही गाडी अर्धातास आधी मडगाव स्थानकात पोहोचली. आता रेल्वे सुरक्षा आयोगाच्या (सीआरएस) मंजुरीनंतर, प्रत्यक्षात तेजस एक्स्प्रेसमधून प्रवाशांना वेगवान प्रवास करणे शक्य होईल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी सकाळी ५ वाजून ०४ मिनिटांनी तेजस एक्स्प्रेस चाचणीसाठी रवाना झाली. ती ७ वाजून २७ मिनिटांनी रोहा स्थानकात पोहोचली. वेळापत्रकाच्या वेळेनुसार तिने १३ मिनिटे आधी स्थानक गाठले. वेळापत्रकानुसार रोहा स्थानकावरील एक्स्प्रेसची वेळ ७ वाजून ४० मिनिटे आहे, तर मडगाव स्थानकात सुमारे ३० मिनिटे आधी, अर्थात दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी तेजस पोहोचली. वेळापत्रकानुसार मडगाव स्थानकाची वेळ २ वाजून ०५ मिनिटे आहे.तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी घेतलेल्या चाचणीचे सीएसएमटी ते रोहा आणि रोहा ते मडगाव अशा दोन भागांत विभाजन करण्यात आले होते. या मार्गावर चाचणी अनुक्रमे ११० किमी आणि १२० किमी प्रतितास या वेगाने पार पडली. सद्यस्थितीत ९० किमी आणि ११० किमी प्रतितास या वेगाने एक्स्प्रेस मुंबई ते गोवा हा टप्पा पार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.संपूर्ण टप्पा टॉप स्पीडने पार करणे अशक्यदरम्यान, सीएसएमटी-मडगाव स्थानकादरम्यान संपूर्ण टप्पा टॉप स्पीडने पार करणे अशक्य आहे. मात्र, शक्य त्या विभागांमध्ये ‘तेजसने’ नियोजित वेगमर्यादेनुसार प्रवाशांविना १५ बोगींसह चाचणी पार पूर्ण केल्याचे रेल्वे अधिकाºयांने सांगितले.माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मे २०१७ मध्ये मुंबई-करमळी मार्गावर तेजस एक्स्प्रेसचे अनावरण केली होती. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र स्क्रीन, स्वयंचलित दरवाजे, प्रशस्त मोकळी जागा ही वैशिष्ट्ये असलेली तेजस एक्स्प्रेस अल्पावधीत प्रवाशांच्या चर्चेत आली होती.प्रवाशांना सुखद आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता यावा, यासाठी तेजस एक्स्प्रेसच्या चाचणीचे नियोजन होते. ही चाचणी यशस्वीपणे पार पडली. चाचणीचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयोगाकडे पाठविण्यात येईल. आयोगाच्या मंजुरीनंतर तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात येईल.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने घटणार!; कोकणवासीयांचा प्रवास लवकरच होणार ‘सुसाट’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 4:25 AM