Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 03:20 PM2024-09-25T15:20:58+5:302024-09-25T15:35:03+5:30
Akshay Shinde Encounter Hearing : आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कंबरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि तीन गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. यावरून स्वत: ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुरु केल्या.
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी झाली. यामध्ये आपल्या मुलाचा एन्काउंटर करून त्याचा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वापर केला जाणार असल्याचा आरोप अण्णा शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या वतीने वकील अमित कटारनवरे यांनी युक्तीवाद केला. यानंतर कोर्टाने सर्व प्रकरण ऐकून घेत पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज सोशल मीडिया, बॅनरद्वारे फिरू लागले आहेत. मग न्यायव्यवस्थेची गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्या शिंदेंनी केला आहे. मुंबई हायकोर्टात न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कमरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि तीन गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. यावरून स्वत: पिस्तुल चालवण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुरु केल्या.
अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असे सवाल न्यायालयाने विचारले. तीन गोळ्या झाडल्या तर उरलेल्या दोन कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याचा लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला.
ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर?
न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते, असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला.
पिस्तूलचे लॉक उघडून ते लोड करून फायर केले का? असा सवाल कोर्टाने विचारला. यावर वकिलांनी ते कसे फायर केले गेले हे सांगितले. यावर न्या. चव्हाण यांनी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, सामान्य व्यक्ती या पिस्तुलचे ट्रेनिंग घेतल्याशिवाय गोळ्या झाडू शकत नाही, असे म्हणत सरकारी वकिलांचा बचाव नाकारला.
तुम्ही कधी पिस्तूल चालवले आहे का?
सामान्य व्यक्तीला स्लायडर मागे खेचता येणार नाही, तुम्ही कधी ते चालवले आहे का असा प्रतिसवाल कोर्टाने वकिलांना केला. मी स्वत: 500 राऊंड फायर केलेले आहेत, यामुळे काही गोष्टी या मलाच न पटणाऱ्या आहेत असे न्या. चव्हाण यांनी म्हटले.
संशयित आरोपी अक्षय शिंदे सोबत गाडीत चार प्रशिक्षित पोलीस होते. यात एक एन्काउंटर स्पेशालिस्ट होता. या सर्वांवर वरचढ ठरून आरोपी पिस्तूल कशीकाय हिसकावू शकतो, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला.
किती लांबून गोळी झाडली गेली?
ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केला तो कोणत्या बॅचचा अधिकारी होता? गोळी कुठून चालविण्यात आली. किती लांबून गोळी झाडली गेली? डोक्यातून आरपार झाल्यावर कुठे गेली? ही गोळी नेमकी कुठे लागली? याचा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करावा. त्या शस्त्राचा फॉरेन्सिक रिपोर्ट केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट निर्देश दिले.
पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर?
अक्षय शिंदेंच्या डोक्यातच गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? आरोपीवर नियंत्रण का मिळवलं नाही, गोळी का मारली? 3 गोळ्या मारल्या, एक लागली, मग इतर दोन गोळ्या कुठे? 4 पोलीस एका आरोपीला कंट्रोल करु शकत नव्हते का? पोलिसांची पिस्तुल अनलॉक का होती? असा सवालही हायकोर्टाने उपस्थितीत केला.