नवी दिल्ली : मुंबई आणि मद्रास या देशातील दोन आद्य उच्च न्यायालयांची अजूनही कायम असलेली ‘बॉम्बे हायकोर्ट’ व ‘मद्रास हायकोर्ट’ ही ब्रिटिशकालीन नावे बदलून त्यांचे त्या त्या शहरांच्या मूळ नावांनुरूप अनुक्रमे ‘मुंबई हायकोर्ट’ आणि ‘चेन्नई हायकोर्ट’ असा नामबदल करण्याची मागणी मान्य होण्याच्या मार्गावर आहे.१९९० च्या दशकात ‘बॉम्बे’चे अधिकृतपणे ‘मुंबई’ झाले व मद्रास ‘चेन्नई’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानुसार या शहरांमधील अनेक संस्थांच्या नावांमध्ये बदल केले गेले, पण तेथील उच्च न्यायालयांची नावे मात्र ‘बॉम्बे’ व ‘मद्रास’ अशीच कायम राहिली. आता या दोन्ही उच्च न्यायालयांच्या नावांमध्ये त्या त्या शहरांच्या मूळ नावानुरूप बदल करण्यासाठी संसदेत कायदा करण्याची केंद्रीय कायदा मंत्रालय तयारी करीत असल्याचे वृत्त आहे. यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला जात आहे. हा कायदा संमत झाल्यावर १९९५ मध्ये ‘बॉम्बे’चे मुंबई झालेल्या या शहरातील ऐतिहासिक उच्च न्यायालयही ‘मुंबई हायकोर्ट’ असे नाव अभिमानाने मिरवील.तीन चार्टर्ड हायकोर्टभारताची सत्ता कंपनी सरकारकडून ब्रिटिश सम्राज्ञीच्या हाती गेल्यावर तेथील संसदेने १८६१ मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ हा कायदा करून भारतीय वसाहतीसाठी उच्च न्यायालये स्थापण्याचे अधिकार राणीला दिले. त्यानुसार सर्वप्रथम १ जुलै १८६२ मध्ये कलकत्ता हायकोर्ट सुरू झाले. त्यानंतर दीड महिन्याने १४ आॅगस्ट १८६२ मध्ये मुंबई उच्च न्यायालय सुरू झाले. मद्रास हायकोर्टही त्याच सुमारास सुरू झाले. भारतीय राज्यघटना अमलात आली तेव्हा देशत ही तीनच उच्च न्यायालये होती. जी उच्च न्यायालये स्थापन झाली त्यांना त्या त्या राज्यांची नावे दिली गेली. पण आधीपासून अस्तित्वात असलेल्या तीन उच्च न्यायालयांची त्या त्या शहरांनुरूप असलेली इंग्रजी नावे नंतरही तशीच कायम राहिली. पूर्वी मध्य प्रांताचे उच्च न्यायालय नागपूरात होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन होताना नागपूर उच्च न्यायालय हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले. कालांतराने १९८६ मध्ये प्रशासकीय सोयीसाठी मराठवाडा व धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी औरंगाबाद खंडपीठ सुरू केले गेले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
‘बॉम्बे हायकोर्ट’चे होणार मुंबई हायकोर्ट
By admin | Published: January 19, 2015 4:50 AM