- महेश चेमटे, मुंबई
कोणत्याही खेळात यशाचे शिखर गाठायचे असल्यास त्या खेळाच्या पायाभूत सुविधा नीटनेटक्या आणि मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे. पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात सरकारच्या अत्यंत उदासीन क्रीडा धोरणामुळे व शाळा, महाविद्यालयांमध्ये असलेल्या नैराश्यामुळे हॉकी मरणासन्न बनली आहे. एकेकाळी हॉकीमध्ये मुंबईचा कमालीचा दबदबा होता; मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. मुंबईच्या सेंट एन्डॅ्यूस, सेंट पिटर्स, डॉन बॉस्को, आॅरलेम या सारख्या जेमतेम १० ते १२ शाळांमध्ये हॉकीचे संघ आहेत. तर खालसा महाविद्यालय, सेंट झेविअर्स, जय हिंद महाविद्यालय, एम. एम. के अशा बोटावर मोजता येईल, एवढे महाविद्यालयीन संघ आहेत.मुंबईतील हॉकीच्या दुरावस्थेला अनेक कारणे आहेत. खेळाच्या साहित्याची वाढलेली किंमत, प्रशिक्षकांची वानवा आणि सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे हॉकीच्या मैदानांची घटती संख्या. आजमितीला ख्रिश्चन मिशनरी शाळा वगळता इतर शाळंमध्ये हॉकीचे नाव देखील घेतले जात नाही. एकेकाळीहॉकीची ओळख ही गरीबांचा खेळ अशी होती. मात्र सध्या खेळाच्या साहित्यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे हा खेळ श्रीमंताचा बनू पाहत आहे. चांगल्या दर्जाची हॉकी स्टिक ४ ते ५ हजारांना मिळू लागली आहे. तर संपूर्ण किटसाठी सुमारे १० हजार मोजावे लागतात. सामान्य कुटुंबांतील खेळाडूंना हे न परवडणारे आहे. त्यातशालेय-महाविद्यालयीन संघांना प्रायोजकत्व लाभणेही अशक्य बनते. महाविद्यालयातील हॉकी स्पर्धांचे आयोजनही हे देखील न उलगडणारे कोडे आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत युनियन लिग आणि अन्य हॉकी स्पर्धा १५ ते २० दिवस चालायच्या. आता अवघ्या दोन दिवसांत या स्पर्धांचा निकाल लागतो. मातीच्या मैदानावर सराव करुन थेट अॅस्ट्रोटर्फवर मॅचेसला सामोरे जावे लागत असल्याने मुंबईतील हॉकीपटूंना अपयश येते. यासाठी सातत्याने अॅस्ट्रोटर्फवर खेळण्याचा सराव महत्त्वाचा ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हॉकीतील जाणकरांच्या मते, वीस वर्षांपूर्वी मुंबई शहरात हॉकीचे १०० हून अधिक संघ होते. त्यात विविध क्लबचा समावेश देखील होता. पूर्वी कूपरेज मैदान, नायगाव पोलिस मैदान, विद्याविहार येथील फातिमा हायस्कूलचे मैदान, आरसीएफ मैदान, खालसा मैदान या ठिकाणी हॉकीची सराव शिबिरे जोमात चालत असत. सध्या चर्चगेट येथील महिंद्रा हॉकी मैदान हे एकमेव हॉकीचे मैदान आहे. त्या मैदानावरील अॅस्ट्रोटर्फ देखील बदलण्याच्या स्थितीत आलेली आहे. साधारणपणे अॅस्ट्रोटर्फची कालमर्यादा ७ ते ८ वर्ष असते. २००९ साली महिंद्रा मैदानावर अॅस्ट्रोटर्फ बसवण्यात आले होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांतील हॉकीची अवस्था सध्या दयनीय बनली आहे. व्यावसायिक हॉकीचे तर चित्रच याहून विदारक आहे. (क्रमश:)आॅनलाईन प्रवेशाचाही फटकामहाविद्यालयांमध्ये लागू करण्यात आलेली आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया देखील हॉकीच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. महाविद्यालयांना हॉकीपटूंची आवश्यकता आहे. मात्र आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे हॉकी वगळता अन्य खेळाडू येत आहेत. ज्यांना हॉकीची आवड आहे, हॉकी टिकवण्याची जिद्द आहे, त्यांना नाईलाजानेहॉकीची सोय नसलेल्या महाविद्यालयात जावे लागले आहे. आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देताना खेळाचा कोणताही विचार होत नाही. हॉकी खेळाडूंना महाविद्यालयातून किट दिले जाते. आज एका चांगल्या दर्जाच्या किटची किंमत तब्बल १० हजारांच्या घरात आहे. एवढा खर्च महाविद्यालयाने करुनही वर्षभरात केवळ दोन स्पर्धा होता. हे सर्वांना माहित आहे, पण बोलण्याची हिंमत कोणामध्येही नाही. - सैनी हरदीप सिंग, फिजिकल डायरेक्टर, खालसा महाविद्यालय