मुंबई - सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी (2 मे) बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. मात्र जावेद अख्तर यांच्या या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारू अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेने जावेद अख्तर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी 'तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू' अशी धमकी जावेद अख्तर यांना दिली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील करणी सेनेने पोस्ट केला आहे. 'आपल्या मर्यादा ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरं जावं' असं या व्हिडीओत म्हटलं आहे.
बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचं मत व्यक्त केलं होतं.
बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घाला - जावेद अख्तरजावेद अख्तर यांनी 'बुरख्याबाबत माझे ज्ञान खूपच कमी आहे कारण ज्या घरात मी राहिलो त्या घरातील सर्व स्त्रिया या कामावर जाणाऱ्या होत्या. मी कधीही घरामध्ये बुरखा पाहिलेला नाही. इराक हा मोठा कट्टर देश आहे. मात्र, तिथे महिला आपला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा, मात्र चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले' असं म्हटलं होतं.
'येथे ( भारत) जर तुम्हाला कायदा (बुरखा परिधान करण्यावर प्रतिबंधासाठी) हवा असेल आणि जर कुणाचे तसे मत असेल तर मला त्याबाबत काहीही आक्षेप नाही. मात्र, राजस्थानमधील मतदान होण्यापूर्वी तेथे कुणीही घुंगट घालणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारने करावी. बुरखाबंदीही व्हावी आणि घुंगटबंदीही व्हावी असे मला वाटते', असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीने मांडल्याचं सांगत अख्तर यांनी एक ट्वीट केलं होतं.
'काही लोक माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी असे म्हटले होते की, श्रीलंकेत हे सुरक्षेच्या दृष्टीने केले गेले असेल, मात्र खरं तर हे महिला सक्षमीकरणासाठी गरजेचे आहे. चेहरा झाकणे बंद व्हायला हवे, मग तो नकाब असो वा घुंगट.' असं ट्वीट जावेद अख्तर यांनी शुक्रवारी पहाटे केलं होतं.