मुंबई : एसटीच्या वातानुकूलित शिवशाही मार्गावरील सर्वाधिक प्रतिसाद ‘मुंबई-कोल्हापूर’ शिवशाहीला लाभत आहे. तथापि, खासगी बसला टक्कर द्यायची झाल्यास या बसची वेळ रात्री १० वरून साडेआठवर आणावी, असा प्रस्ताव कोल्हापूर विभागाने मुंबईला पाठविला आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांनीदेखील वेळ बदलणे सोयीचे ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत.अत्याधुनिक सुविधांनी युक्त वातानुकूलित शिवशाही मुंबई-कोल्हापूर मार्गावर सुरू झाल्याने खासगी बसमालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. खासगी बसपेक्षा ही सेवा स्वस्त आणि उत्तम आहे. यामुळे प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अन्य मार्गांवरदेखील शिवशाही धावत आहे. मात्र अन्य शिवशाहीच्या तुलनेत मुंबई-कोल्हापूर मार्गावरील शिवशाहीचे भारमान सुमारे ७० टक्के आहे. कोल्हापूर येथून सुटणाºया शिवशाहीची वेळ योग्य आहे. मात्र मुंबई सेंट्रल येथून रात्री १० वाजता ऐवजी रात्री ८.३० वाजता बस सोडल्यास त्याचा महामंडळाला फायदा होईल, असा प्रस्ताव मुंबई विभागाला प्राप्त झाला आहे.महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनीदेखील कोल्हापूर विभागाच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे. मुंबईत शहरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यामुळे शहराबाहेरील प्रवाशांना शिवशाहीची बराच वेळ वाट पाहावी लागते.याचा नेमका फायदा खासगी लक्झरी बसचालक उचलत आहेत. परिणामी दीड तास आधी मुंबई सेंट्रल येथून मार्गस्थ केल्यास प्रवासी संख्या वाढेल, असे एसटी अधिकाºयांनी खासगीत मान्य केले आहे. रात्री ८.३० वाजता एसटी सोडण्यासह दिवसादेखील शिवशाही फेरीचे नियोजन करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. यामुळे मुंबई-कोल्हापूर शिवशाहीची वेळ लवकरच बदलणार असल्याचे संकेत एसटी महामंडळाकडून मिळत आहे.
मुंबई-कोल्हापूर ‘शिवशाही’ची वेळ बदलणार, खासगी बसला टक्कर देण्यासाठी पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:14 AM