मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 09:48 PM2019-03-27T21:48:03+5:302019-03-27T21:49:01+5:30
पालघरमध्ये मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या खासदाराने शिवसेनेते प्रवेश केला आहे.
मुंबई : मुंबई आणि कोकण विभागात नेहमीप्रमाणे शिवसेनेलाच मताधिक्य मिळणार आहे. मात्र, रायगडामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना राष्ट्रवादी जोरदार धक्का देणार असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनने केलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पुत्राचा पुन्हा एकदा पराभव होणार असल्याचा अंदाज दाखविण्यात आला आहे.
पालघरमध्ये मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या खासदाराने शिवसेनेते प्रवेश केला आहे. ही जागा शिवसेना जिंकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर रायगड शिवसेनेच्या हातून जाणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीतही शिवसेनेचेच वर्चस्व दिसून येईल. कल्याण, ठाणे, मुंबई उ., मुंबई उ. पश्चिम, द. मध्य, दक्षिण मतदारसंघ शिवसेना जिंकेल आणि भाजपा मुंबई उ, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य हे मतदारसंघात जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भिवंडीची एकमेव जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे या सर्व्हेमध्ये नोंदविण्यात आले आहे.
कोणाला कीती जागा मिळणार
एबीपी माझा आणि नेल्सनने आज लोकसभा निवडणूक पूर्व सर्व्हे जाहीर केला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपकडे महाराष्ट्राचा कल असल्याचे दाखविले आहे. भाजपाला 20 जागा तर शिवसेनेला 17 जागा मिळणार असल्याचा अंदाज यामध्ये वर्तविण्यात आला आहे. तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 5 जागा जिंकता येणार असून स्वाभिमानीचे राजू शेट्टी एका जागेवर जिकतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.