ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात झालेला अटीतटीचा सामना अद्यापही चालू असून हा सामना नेमका जिंकणार कोण याची उत्सुकता वाढू लागली आहे. दोन्ही पक्ष माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून महापौर आपलाच झाला पाहिजे या निर्णयावर ठाम आहेत. त्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षांना आपल्याकडे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्नही दोन्ही पक्षांकडून होत आहे. या शर्यतीत शिवसेना मागे पडल्याचं चित्र असून मनसे आणि एमआयएम भाजपाला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपाने आतापर्यंत 84 नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. त्यातच आता मनसे आणि एमआयएम भाजपाला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपा आधीच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
भाजपाने या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. आज मुंबईत महापौर पदाचा अर्ज भरायचा असल्याने भाजपाने शुक्रवारी कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. बैठकीत सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली. महापौरपदाचा उमेदवार म्हणून भाजपा कोणता चेहरा समोर आणणार आहे हे जरी गुलदस्त्यात असलं तरी तो मराठी चेहरा असेल अशी शक्यता आहे.