महिला काय करू शकत नाहीत? आज सैन्यात आहेत, कार, बस, विमाने चालवितात, मेट्रोही चालवितात. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला त्या मेट्रोचे सारथ्य एका तरुणीने केले. याच तरुणीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रोतून सैर करविण्याचे भाग्य मिळाले. परंतू, तीन वर्षांपूर्वी तिची परिस्थीती खूप वाईट होती.
मुंबई मेट्रोमध्ये एकूण ९१ पायलट आहेत. यापैकी २१ महिला आहेत. त्यातलीच एक तृप्ती शेटे. मोदी आपल्या मेट्रोत बसणार हे तिला माहिती होते. ती उत्साहात देखील होती. अवघे २७ वर्षांचे वय असलेली तृप्ती नर्व्हस नव्हती परंतू थोडे दडपण होतेच. माझ्यासाठी हा गर्वाचा क्षण होता असे तृप्तीने म्हटले आहे.
मेट्रो 2 ए च्या ट्रायल रनवेळी गेल्यावर्षी उद्धव ठाकरे ती चालवत असलेल्या मेट्रोत बसले होते. एवढ्या मोठमोठ्या महनीय व्यक्तींना मेट्रोतून सैर करवण्याचे भाग्य तिला लाभले असले तरी नोकरी मिळविण्यासाठी तिला खूप झगडावे लागले होते.
तृप्ती ही मुळची औरंगाबादची आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये तिने डिप्लोमा आणि बॅचलर्स केले आहे. यानंतर तिने २०२० मध्ये हैदराबादमध्ये मेट्रो पायलटचे ट्रेनिंगही घेतले आहे.
तृप्ती शेटे हिने सांगितले की, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला तीन वर्षे नोकरीसाठी संघर्ष करावा लागला होता. एक महिला असल्याने ही संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. विशेषत: 91 पायलटांमध्ये स्वत:साठी जागा बनवणे हे खूप आव्हानात्मक होते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही आणि जे मेहनत करतात त्यांना त्यांचे लक्ष्य निश्चितच मिळते.