ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - बहुप्रतिक्षित मेट्रो रेल्वे आता मुंबईकरांच्या सेवेसाठी तयार झाली असून उद्यापासून (रविवार, ८ जून) मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या टप्प्याचे उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबतशनिवारी अधिकृत घोषणा केली.
रविवारी सकाळी १० वाजल्यापासून 'मेट्रो' मुंबईकरांसाठी सुरू करण्यात येणार असून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ती धावणार आहे. चार एसी डबे असलेल्या मेट्रोचा वेग प्रतितास ८० किमी इतका असून एका वेळेस मेट्रोतून १५०० प्रवासी प्रवास करू शकतात. सकाळी ५.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत असेल. मेट्रोमुळे वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी फक्त २१ मिनीटांचा कालावधी लागणार आहेत. दर चार मिनिटांनी एक मेट्रो धावणार असून प्रत्येक स्टेशनवर मेट्रो ३० सेकंदांसाठी थांबेल.