मीरा भाईंदर - आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. लोकशाहीतील भारतीय संविधानाचा उत्सव. या संविधानानेच आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले आहे. आज आपण अशाच एका कुटुंबाची कहाणी सांगणार आहोत ज्यांना या संविधानामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. मीरा रोड येथील डॉ. खुर्शीद शेख (५४), डॉ. सबिना शेख (४६) आणि त्यांची मुलगी आयेशा (१८) यांची ही कहाणी आहे. हे तिघेही फौजदारी खटल्यात न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा अभ्यास करत आहेत.
सबिना शेख यांच्या वडिलांनी ८० च्या दशकात भायखळ्यात तिच्यासाठी एक मालमत्ता खरेदी केली होती. मात्र सबिनाच्या भावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ती मालमत्ता हडप केली. भावांशी बोलूनही तोडगा निघाला नाही, तेव्हा त्यांनी २०१७ मध्ये पोलिस ठाण्यात तक्रार केली. जवळपास वर्षभर पोलिसांनी कोणताही एफआयआर नोंदवला नाही, त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आला असे असतानाही वकील आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तपास पुढे सरकला नाही. २०२३ पर्यंत शेख कुटुंबीयांनी ५ वकील बदलले होते आणि सुमारे ५ लाख रुपये खर्च केले होते. न्यायाचा हा लढा सुरू ठेवण्यासाठी अखेर संपूर्ण कुटुंबाने एलएलबी करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ.खुर्शीद शेख यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. त्यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस केले जाते. खुर्शीद यांच्यासोबत त्यांची पत्नी सबिना आणि मुलगी आयशा याही एलएलबी करत आहेत जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत अन्यायाविरोधात उभा केलेला लढा अर्ध्यावर थांबू नये. आम्हाला आमचे वय आणि आरोग्याबाबत जाणीव आहे. त्यामुळे भविष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही तयारी करत आहोत असं सबिना यांनी म्हटलं. जेव्हा २०२३ पर्यंत एफआयआरमध्ये कुठलाही तपास पुढे गेला नाही तेव्हा डॉ. खुर्शीद यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले.
खुर्शीद यांनी कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. त्या लढाईत खुर्शीद यांना पहिल्यांदाच यश मिळाले. डिसेंबर २०२३ मध्ये कोर्टाने पोलिसांना फटकारले आणि तपास अधिकारी बदलण्याचे आदेश दिले. कोर्टानेही तपास अधिकारी यांच्यावर कारवाई केली.