मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचा करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबतच्या ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेत मंगळवारी बहुमताने मंजूर करण्यात आली़ समाजवादी पक्षाने त्यास आव्हान देत उर्दू शाळांमध्ये ‘सलाम वालेकुम’ बोलू, असे ठणकावले़ सर्वच विरोधी पक्ष भाजपाविरोधात उभे ठाकले़ मात्र या वादळी चर्चेवेळी बघ्याच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने मतदानावेळी युती धर्म पाळला़ पालिकेच्या ११०० शाळा असून, यामध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ पालिकेच्या शाळांमध्ये रोज सकाळी प्रार्थनेवेळी योग व त्यात विशेषत: सूर्यनमस्कार सक्तीचा करावा, अशी ठरावाची सूचना भाजपाच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी ठेवली होती़ मात्र या सूचनेविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजवादी पक्षाने सर्वच विरोधी पक्षांना साकडे घातले होते़ विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार ऐच्छिक असावा, अशी उपसूचना मांडली़ या उपसूचनेला मनसे आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला़ मात्र भाजपाने यावर मतदान घेतले़ शिवसेनेने मित्रपक्षालाच साथ दिल्यामुळे ही सूचना मंजूर झाली़ त्यामुळे विरोधी पक्षांनी अखेर मतदानानंतर सभात्याग केला़ (प्रतिनिधी)>शिवसेनेने पाळला युती धर्मशिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भाजपाने सुरुंग लावायचा आणि भाजपाचे स्वप्न शिवसेनेने भंग करायचे, असा खेळ गेले वर्षभर सुरू आहे़ या ठरावाच्या सूचनेबाबतही शिवसेनेने ठोस भूमिका घेतली नव्हती़ मात्र मतदानावेळी शिवसेनेने भाजपाच्या बाजूने कौल दिला़ त्यामुळे ही ठरावाची सूचना मंजूर झाली आहे़ ही सूचना पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येईल़ त्यानंतर आयुक्त ही सूचना राज्य सरकारकडे पाठवतील़ मात्र सत्ता भाजपाची असल्याने त्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे़177देशांमधील शाळांमध्ये योगा सक्तीचे आहे़ यापैकी ४७ हे मुस्लीम देश आहेत, असा दावा भाजपाने केला.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक
By admin | Published: August 24, 2016 6:19 AM