मुंबई : राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा ३० हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर हा नवा द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) येत्या चार वर्षांत बांधण्यात येणार असून या मार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यानचे प्रवासी अंतर दहा तासांत पार करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मुंबई-नागपूर हे सुमारे आठशे किलोमीटर लांबीचे अंतर मोटारीने पार करण्यासाठी सोळा तास लागतात. नवा दु्रतगती महामार्ग झाला तर हेच अंतर सहा तासांनी कमी होईल. मुंबई-घोटी-औरंगाबाद-अमरावती-नागपूर असा हा प्रस्तावित मार्ग आहे. या मार्गाचे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनता स्वागत करील. नव्या एक्स्प्रेस वेची सर्व कामे सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी नियोजन असून केंद्र शासनासोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत ते केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)कम्युनिकेशन वे!आॅप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही, वायफाय अशा संपर्काच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने हा मार्ग ‘कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वे’ ठरणार आहे. मार्गालगत ज्या ठिकाणी शक्य आहे अशा ठिकाणी माहिती तंत्रज्ञान उद्याने, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले उभारण्याचा शासनाचा मानस आहे. दोन टप्प्यांत होणार काम...1) भूसंपादनासह चार पदरी रस्ता तयार केला जाईल.2) सहा पदरी काँक्रीट रस्ता, आवश्यक तेथे सेवा रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल उभारणार.मुंबई-नागपूर असा एक्स्प्रेस वे करण्याची घोषणा आधीही झाली होती, पण तो एक्स्प्रेस वे झालाच नाही. त्याऐवजी दुपदरी मार्ग झाला. आता या मार्गावर ठिकठिकाणी सुविधांचे जाळे उभारले जाईल. सध्याच्या मार्गाचे स्वरूप पूर्णत: बदलले जाणार आहे.
मुंबई-नागपूर प्रवासासाठी लागणार अवघे दहा तास!
By admin | Published: August 01, 2015 5:03 AM