कसारा : उभ्या असलेल्या टॅँकरला धडक देऊन उलटलेल्या ट्रकमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती. मुंबईहून नाशिककडे जाणारा टॅँकर बिघडल्याने २३ मार्च रोजी रस्त्यालगत उभा केला होता. त्या टॅँकरभोवती कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स वा सिग्नल लावलेले नव्हते. गुरुवारी पहाटे ५.३०च्या सुमारास मुंबईहून नाशिककडे सळया घेऊन निघालेला ट्रक चढण चढत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकरला धडकून उलटला. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. त्यानंतर, नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत करण्यात आला. परंतु, या मार्गावरही एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे ५ तास वाहतूक ठप्प होती.पोलीस यंत्रणा मेटाकुटीस :या अपघातानंतर झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणा मेटाकुटीस आली. महामार्गावर लहान गाड्यांची संख्या प्रचंड होती. प्रत्येक वाहनचालक मिळेल त्या जागेत गाडी घुसवत असल्याने कोंडी झाली होती. पहाटे ५.३० ते १०.३० या वेळेत ही कोंडी सोडविण्याचा पोलीस प्रयत्न करत होते.- सलग चार दिवस सुट्या आल्याने मुंबई व ठाण्यातील पर्यटक शिर्डी, नाशिक व अन्य ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसह निघाले होते. मात्र, कसारा घाटालगतच वाहतूककोंडीमध्ये सुमारे ४ ते ५ तास खोळंबा झाल्याने पर्यटक-यात्रेकरूंचा हिरमोड झाला.
मुंबई-नाशिक महामार्ग ५ तास ठप्प
By admin | Published: March 25, 2016 2:17 AM