मुंबई- मुंबईत १९९१ मध्ये वाहनांची संख्या ६ लाख २८ हजार होती. २०१४ अखेर ही संख्या २४ लाख ७५ हजारांच्या घरात गेली आहे. याखेरीज बृहन्मुंबईच्या हद्दीत दररोज दीड लाख वाहने प्रवेश करतात. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरील ताण वाढत आहे. मुंबईत किमान ५० हजार वाहनतळ सुविधा निर्माण करण्याची गरज बुधवारी मंत्रालयातील बैठकीत व्यक्त झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेने मोकळ््या जागांबाबतच्या सध्याच्या धोरणाचे उल्लंघन न करता वाहनतळ उभारण्याकरिता पर्यायी जागांचा शोध घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मुंबई शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी वाहनांची वाढती संख्या व वाहतळांची अनुपलब्धता यावर प्रकाश टाकला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात येईल. बृहन्मुंबईतील महत्वाच्या पाँइंटवर विशेष कॅमेरे बसवण्यात येतील. त्यामुळे सिग्नल तोडणे, स्टॉप लाईनच्या पुढे वाहन उभे करणे, वाहन बेदरकारपणे चालवणे आदी गुन्हे करणाऱ्या चालकांवर कारवाई शक्य होईल. केंद्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षितता कायद्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडाची आणि चालकाचा परवाना रद्द करण्याची तरतूद असल्याकडे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी लक्ष वेधले. मुंबई प्रमाणेच ठाणे शहराची वाहतूक समस्याही गंभीर असून वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली हा मेट्रो मार्ग एमएमआरडीएने मंजूर केला आहे. ठाणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यात ४० मीटर रुंद मास ट्रान्झिट रुट प्रस्तावित आहे. या रस्त्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत येतो. याबाबतच्या कामाचा आढावा घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत गरज ५० हजार वाहतळ उभारण्याची
By admin | Published: January 15, 2015 5:10 AM