नाशिक - Sanjay Raut on Naseem Khan ( Marathi News ) नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. जर आजही काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार बदलून नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास त्यांना ताकदीने निवडून आणू असा विश्वास उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी या मुद्द्यावर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, नसीम खानबाबत मल्लिकार्जुन खरगेंना चुकीची माहिती इथल्या नेत्यांनी दिली. नसीम खान काँग्रेसचे ताकदवान नेते आहेत. आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. ते निवडणूक लढवू इच्छितात, यावर त्यांची माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंसोबत बोलणंही झालं होते. आम्ही कधीही नसीम खान यांना उमेदवारी देऊ नका असं म्हटलं नाही. हा निर्णय काँग्रेस पक्षाचा आहे असं राऊतांनी म्हटलं.
तसेच काँग्रेस पक्षाकडे जितक्या जागा त्यावर त्यांनी उमेदवार निवडलेत. जर आजही काँग्रेसला वाटत असेल नसीम खान यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी द्यावी तर हा काँग्रेसचा निर्णय आहे. महाविकास आघाडीचा जो धर्म आहे त्याचे पालन आम्ही करू आणि नसीम खान यांना निवडून आणू. हा काँग्रेस पक्षातील अंतर्गत विषय आहे. आमचा संबंध नाही. वर्षा गायकवाड असो, नसीम खान हा निर्णय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. आजही त्यांना उमेदवार बदलायचा असेल तर बदलू शकतात. आमचा पक्ष पूर्णपणे त्या उमेदवाराच्या पाठीशी असेल असंही संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत. नरेंद्र मोदी खोट बोलत आहेत, त्यांच हे खोटं बोलणं गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड होणार आहे. उद्धव ठाकरे यांना कुटुंब आहे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून त्यांना वारसा आहे. तुम्ही आमच्या नादाला लागा, तुमच्या नादाला लागण्या इतपत तुम्ही मोठे नेते नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण फार दिवस चालणार नाही. राज्यात फक्त फोडाफोडीचे राजकारण झाले असं सांगत संजय राऊतांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला.